जात पडताळणीच्या नावाखाली उघड भ्रष्टाचार!धुळ्यात ९ हजारांची लाच घेताना प्रकल्प सहायक रंगेहात अटकेत

फुले शाहू आंबेडकर
0
धुळे /प्रतिनिधी :शैक्षणिक प्रवेश आणि नोकरीसाठी अत्यावश्यक असलेल्या जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेलाच काळी छाया फासणारा धक्कादायक प्रकार धुळ्यात उघडकीस आला आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातील प्रकल्प सहायकाने थेट लाचेची मागणी करून नागरिकांची अडवणूक केल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कारवाईत समोर आले आहे.
तक्रारदाराकडून ९ हजार रुपयांची लाच स्वीकारताना प्रकल्प सहायक इम्रान अब्दुल रशिद अन्सारी याला एसीबीने रंगेहात अटक केली. या प्रकरणात कनिष्ठ लिपीक प्रमोद रामराव पाटील याचाही सहभाग निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जात पडताळणी रखडवून लाचेचा सौदा
तक्रारदाराने आपल्या शालकाच्या ओबीसी जातीच्या प्रमाणपत्र पडताळणीसाठी २१ जुलै २०२५ रोजी ऑनलाईन अर्ज करून आवश्यक सर्व कागदपत्रे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात वेळेत सादर केली होती. सुनावणीदरम्यानही अतिरिक्त कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. मात्र, अनेक महिने उलटूनही प्रमाणपत्र न मिळाल्याने तक्रारदाराने वारंवार कार्यालयात पाठपुरावा सुरू ठेवला.
याच दरम्यान प्रकल्प सहायक इम्रान अन्सारी याने काम करून देण्यासाठी तब्बल १२ हजार रुपयांची लाच मागितली. त्यापैकी ३ हजार रुपये ‘फोन पे’द्वारे घेतल्यानंतरही काम करण्यात आले नाही.
‘पैसे दिल्याशिवाय काम होणार नाही’
दोन महिने उलटूनही जात प्रमाणपत्र पडताळणी न झाल्याने तक्रारदार पुन्हा कार्यालयात गेला असता, कनिष्ठ लिपीक प्रमोद पाटील याने उर्वरित रकमेची मागणी करत “पैसे दिल्याशिवाय काम होणार नाही” असे स्पष्ट सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे.
एसीबीचा सापळा अन् रंगेहात अटक
या भ्रष्टाचाराला कंटाळून तक्रारदाराने ८ जानेवारी २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे येथे अधिकृत तक्रार दाखल केली. पंचांसमक्ष पडताळणीदरम्यान ९ हजार रुपयांमध्ये तडजोड झाल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर १९ जानेवारी २०२६ रोजी एसीबीने सापळा रचत कारवाई केली आणि इम्रान अन्सारी याला ९ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.
भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा
या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईचे पर्यवेक्षण पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांनी केले असून, सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे यांनी काम पाहिले. पुढील तपास पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल करीत आहेत.
प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह
या घटनेमुळे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातील कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. शैक्षणिक प्रवेश, नोकरी आणि शासकीय योजनांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या प्रक्रियेत लाचखोरीमुळे सामान्य नागरिकांची अडवणूक होत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
नागरिकांना आवाहन
दरम्यान, कोणताही शासकीय, निमशासकीय कर्मचारी किंवा खासगी व्यक्ती काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default