बाबा धीरजसिंग यांच्या हत्येनंतर गुरुद्वारामध्ये कोणताही वाद न होता धार्मिक विधी पार पडावेत, अशी अनुयायांची भूमिका आहे. मात्र बाबा रणवीरसिंग यांनी गुरुद्वाराच्या मुख्य दरवाजाला कुलूप लावल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामुळे संतप्त झालेल्या अनुयायांनी बाबा धीरजसिंग यांचे बंधू बाबा दारासिंग, मेहुणे भूपेंद्रसिंग यांच्यासह शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली.
सायंकाळी पोलिस ठाण्यात जमलेल्या अनुयायांनी “कुलूप तात्काळ काढावे, दोषींवर कायदेशीर कारवाई करावी आणि गुरुद्वाराला पोलिस बंदोबस्त द्यावा” अशा मागण्यांवर ठाम भूमिका घेतली. मागण्या मान्य न झाल्यास सोमवारी महामार्गावर ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांनी अनुयायांशी थेट चर्चा केली. चर्चेनंतर या प्रकरणी रणवीरसिंग निहंग, दलेरसिंग निहंग, जगविंदरसिंग हरप्रीतसिंग यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येईल, कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले.
विशेष म्हणजे, बाबा धीरजसिंग यांच्या हत्येनंतर पोलिसांत दाखल होणारी ही दुसरी तक्रार आहे. मूळ हत्या प्रकरणाचा तपास सध्या सीआयडीकडे असून, या नव्या तक्रारीचा तपास शहर पोलिस ठाण्याकडून करण्यात येणार आहे. मात्र तपासातील घडामोडींची माहिती सीआयडीला पत्राद्वारे कळवली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
हत्या प्रकरणानंतर शांततेची अपेक्षा असताना, गुरुद्वाराला कुलूप लावण्याच्या घटनेने शहरातील वातावरण पुन्हा तापले असून पुढील आंदोलनाची शक्यता नाकारता येत नाही. आता पोलिसांची भूमिका आणि तपासाची दिशा याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
