नगरपरिषद निवडणुकीत भाजपने ३१ नगरसेवकांच्या जागा जिंकत एकहाती बहुमत मिळवले. त्यानंतर नगराध्यक्षपदी चिंतन पटेल, तर उपनगराध्यक्षपदी संगीता देवरे यांची निवड करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर विषय समिती सभापती व सदस्यांच्या निवडीसाठी २० रोजी विशेष सभा घेण्यात आली.
या सभेत प्रत्येक विषय समितीच्या सभापतिपदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे कोणताही वाद, चर्चा किंवा चुरस न होता सर्वच सभापतींची बिनविरोध निवड निश्चित झाली. मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी निवडीची अधिकृत घोषणा केली. निवड प्रक्रिया पार पाडताना प्रशासकीय अधिकारी संजय हासवानी आणि सागर कुलकर्णी यांनी सहकार्य केले, तर सागर कुलकर्णी यांनी सभेच्या शेवटी आभार मानले.
विकासाची जबाबदारी अनुभवी नेतृत्वाकडे
बांधकाम समितीची सूत्रे वासुदेव देवरे यांच्या हाती देण्यात आली असून शहरातील रस्ते, गटारे, नागरी सुविधा आणि विकासकामांना गती देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समितीचे सभापती म्हणून श्यामकांत ईशी यांच्याकडे विद्यार्थ्यांपासून खेळाडूंपर्यंत आणि सांस्कृतिक उपक्रमांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समितीची धुरा डॉ. वृषाली बडगुजर सांभाळणार असून आरोग्य सुविधा, स्वच्छता मोहिमा आणि नागरिकांच्या आरोग्यविषयक प्रश्नांवर भर दिला जाणार आहे. पाणीपुरवठा व जलनि:सारण समितीचे सभापती गणेश सावळे यांच्याकडे शहरातील पाणीप्रश्न आणि सांडपाणी व्यवस्थापनाची महत्त्वाची जबाबदारी असेल. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदी अरुणा थोरात यांची निवड झाल्याने महिलांसाठीच्या योजना आणि बालकल्याण उपक्रमांना बळ मिळणार आहे. नियोजन व विकास समितीची जबाबदारी उपनगराध्यक्ष संगीता देवरे यांच्याकडे देण्यात आली आहे.
विषय समितीनिहाय सभापती :
स्थायी समिती – नगराध्यक्ष चिंतन पटेल
बांधकाम समिती – वासुदेव देवरे
शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य – श्यामकांत ईशी
स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य – डॉ. वृषाली बडगुजर
पाणीपुरवठा व जलनि:सारण – गणेश सावळे
नियोजन व विकास – संगीता देवरे
महिला व बालकल्याण – अरुणा थोरात
विषय समित्यांच्या या बिनविरोध निवडीमुळे शिरपूर नगरपरिषदेत भाजपची सत्ता अधिक मजबूत झाली असून, येत्या काळात शहर विकासाच्या निर्णयांवर सत्ताधाऱ्यांचा ठसा ठळकपणे उमटणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
