जालना / प्रतिनिधी : जालना जिल्ह्यातील वरखेडी परिसरात एका २६ वर्षीय विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बेपत्ता झालेल्या बहिणीचा शोध घेण्यासाठी धाव घेतलेल्या भावाला थेट विहिरीत बहिणीचा मृतदेह पाहावा लागल्याने या घटनेने सर्वांचे काळीज हादरले आहे.
मयत विवाहितेचे नाव अश्विनी अमोल जोगदंड असे असून, आज दुपारच्या सुमारास गावालगत असलेल्या विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला. विशेष म्हणजे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात असल्याने हा प्रकार आत्महत्येचा नसून घातपाताचा असावा, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, अश्विनी कालपासून घरातून बेपत्ता होती. तिचा पती अमोल जोगदंड याने याबाबत अश्विनीच्या माहेरच्यांना माहिती दिली. ही बातमी कळताच अश्विनीचा भाऊ संदीप खरात तातडीने वरखेडी गावात दाखल झाला. बहिणीचा शोध सुरू असतानाच पतीने अचानक गावाजवळील विहिरीत मृतदेह आढळल्याची माहिती दिली.
संदीप विहिरीकडे पोहोचताच जे दृश्य समोर आले, त्याने त्याच्या पायाखालची जमीन सरकली. विहिरीत रक्ताने माखलेला बहिणीचा मृतदेह पाहून त्याने आक्रोश केला. हा टाहो ऐकून गावकऱ्यांची मोठी गर्दी घटनास्थळी जमली.
भावाचे गंभीर आरोप
या प्रकरणी अश्विनीचा भाऊ संदीप खरात याने थेट पती अमोल जोगदंड याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “माझ्या बहिणीचा नेहमी मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. चारित्र्याच्या संशयावरून आणि घरगुती वादातूनच तिचा बळी गेला असावा,” असा आरोप संदीपने केला आहे.
अश्विनीचे वडील मुंबईत मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. काही दिवसांपूर्वीच तिच्या आईचे निधन झाले होते. आईच्या छत्राविना संसार सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या अश्विनीचा असा अंत झाल्याने माहेर व सासर दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली आहे.
दोन चिमुकल्यांवर दुःखाचा डोंगर
या घटनेत अश्विनीच्या दोन लहान मुलांच्या डोक्यावरून आईचे छत्र हरपले आहे. निष्पाप लेकरांचे भविष्य काय, हा प्रश्न उपस्थित होत असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलीस तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
अश्विनीने स्वतः विहिरीत उडी घेतली की तिची हत्या करून मृतदेह विहिरीत टाकण्यात आला, याचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. सध्या संपूर्ण जालना जिल्ह्यात या घटनेची जोरदार चर्चा होत असून, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
