लाडकी बहीण योजनेची रक्कम वैयक्तिक नाही, शाळेसाठी!प्रजासत्ताक दिनी जयाबाई पाटील यांचा धडाकेबाज निर्णय, विखरण शाळेला थेट ११ हजारांची मदत

फुले शाहू आंबेडकर
0
प्रतिनिधी/विखरण (ता. शिरपूर | जि. धुळे)
राजकारणात आरोप-प्रत्यारोप आणि समाजकारणात केवळ आश्वासनांचे राजकारण सुरू असताना विखरण गावात मात्र प्रजासत्ताक दिनी वेगळाच संदेश देणारी घटना घडली. शिरपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) विधानसभा क्षेत्राचे तालुका अध्यक्ष शिवश्री दिलीप भाईदास पाटील आणि त्यांच्या पत्नी शिवमती जयाबाई दिलीप पाटील यांनी सामाजिक जाणिवेचा थेट कृतीतून ‘धडाका’ केला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत मिळालेली आर्थिक मदत अनेक ठिकाणी वैयक्तिक गरजांसाठी वापरली जात असताना, जयाबाई दिलीप पाटील यांनी मात्र हा पैसा थेट विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी खर्च करण्याचा ठाम निर्णय घेतला. योजनेतून मिळालेल्या रकमेतून ११ हजार रुपये त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, विखरण यांना आज २६ जानेवारी – प्रजासत्ताक दिनी औपचारिकरित्या सुपूर्द केले.
ही रक्कम शाळेचे मुख्याध्यापक वाघ साहेब व त्यांच्या संपूर्ण शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत स्वीकारण्यात आली. शिक्षणासाठी झगडणाऱ्या ग्रामीण शाळांसाठी ही मदत केवळ आर्थिक नव्हे, तर मनोबल वाढवणारी ठरली आहे.
या कार्यक्रमाला विखरण गावाच्या सरपंच शिवमती रुपालीताई कवरदास पाटील, कवरदास भाईदास पाटील, सचिन भिमराव विखरणकर (सर) – साने गुरुजी विद्यालय, विखरण, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी जयाबाई पाटील यांच्या या निर्णयाचे खुलेपणाने कौतुक केले.
“शासनाची योजना म्हणजे लाभ घेऊन गप्प बसणे नव्हे, तर त्या लाभातून समाज घडवणे,” असा ठोस संदेश या कृतीतून देण्यात आला. राजकीय पद, सामाजिक ओळख आणि कौटुंबिक प्रतिष्ठा बाजूला ठेवून थेट शाळेसाठी मदत देणे ही बाब सध्याच्या काळात दुर्मीळ ठरत आहे.



प्रजासत्ताक दिनी संविधानाच्या मूल्यांची आठवण करून देणारी ही घटना विखरणसह संपूर्ण शिरपूर तालुक्यात चर्चेचा विषय ठरली असून, “लाडकी बहीण योजना समाजघडवणीसाठीही वापरता येते” हे जिवंत उदाहरण जयाबाई पाटील यांनी उभे केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default