मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे विशेष कार्यकारी अधिकारी प्रा. सुशिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व रायगड जिल्हा NSS समन्वयक प्रा. तुळशिदास मोकल यांच्या काटेकोर नियोजनातून रायगड जिल्ह्याचा संघ या शिबिरात सहभागी झाला होता. शेठ जे. एन. पालीवाला महाविद्यालयाचे NSS कार्यक्रम अधिकारी डॉ. अनिल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली रायगडच्या स्वयंसेवकांनी शिस्त, धैर्य आणि संघभावनेचा आदर्श घालून दिला.
या शिबिरात महाराष्ट्रातील २४ विद्यापीठे, ३६ जिल्हे, १०४८ विद्यार्थी स्वयंसेवक आणि ८७ संघनायक व कार्यक्रम अधिकारी सहभागी झाले होते. आठ दिवस चाललेल्या या शिबिरात राष्ट्रीय आपदा निवारण दल (NDRF) च्या अनुभवी जवान व अधिकाऱ्यांनी स्वयंसेवकांना बचावकार्य, आपत्कालीन प्रतिसाद, प्राथमिक उपचार, आपत्ती काळातील व्यवस्थापन, शिस्त, नेतृत्वगुण व संघभावना यांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले. तज्ञ मार्गदर्शकांच्या व्याख्यानांमधून आपत्ती व्यवस्थापनाबाबत सखोल ज्ञान देण्यात आले.
संस्कृतीचा ठसा, पुरस्कारावर मोहोर
आव्हान शिबिरातील सांस्कृतिक मिरवणूक हा कार्यक्रमाचा कळस ठरला. रायगड जिल्ह्याच्या संघाने पारंपरिक ‘बाल्या नृत्य’ सादर करून प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवलं, तर मुलींनी सादर केलेल्या कोळी नृत्याने रायगडच्या लोकसंस्कृतीचे प्रभावी दर्शन घडवले. मिरवणुकीच्या शेवटी ‘दोनच राजे इथे गाजले’ ही नाटिका सादर करत छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेतून स्वराज्य, न्याय, समता, बंधुता आणि समानतेचा ठाम संदेश देण्यात आला.
या दमदार सादरीकरणाची दखल घेत आयोजकांनी ३६ जिल्ह्यांतून रायगड जिल्ह्याच्या संघाची निवड करून प्रतिष्ठेचा ‘सर्वोत्तम मिरवणूक पुरस्कार’ जाहीर केला. हा पुरस्कार डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद रामराव गडाख यांच्या शुभहस्ते शिबिराच्या समारोपप्रसंगी प्रदान करण्यात आला.
विद्यापीठ प्रशासनाकडून कौतुकाची थाप
रायगड जिल्ह्याच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. रविंद्र कुळकर्णी, प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे आणि कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या संघाचे कौतुक करत अभिनंदन केले.
या यशामागे रायगड जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, NSS विभागीय समन्वयक व कार्यक्रम अधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. विशेषतः सी. के. टी. महाविद्यालय, पनवेल आणि शेठ जे. एन. पालीवाला महाविद्यालय, पाली–सुधागड यांनी दिलेल्या सहकार्यामुळेच रायगडचा संघ राज्यपातळीवर उजवा ठरल्याचे बोलले जात आहे.
आपत्तीशी दोन हात करण्यासाठी सज्ज झालेला रायगड NSS संघ आता केवळ स्वयंसेवकांचा गट न राहता, संकटात धावून जाणारी मजबूत ताकद बनला आहे – आणि ‘आव्हान’ शिबिरातील यश हे त्याचे ठोस उदाहरण ठरले आहे.

