धुळे हादरले! अनैतिक संबंधांच्या संशयातून जळगावच्या तरुणाचा खून; मृतदेह धुळ्यात नेऊन जाळल्याची धक्कादायक घटना

फुले शाहू आंबेडकर
0
धुळे | प्रतिनिधी :
जळगाव जिल्ह्यातील एका व्यक्तीचा अनैतिक संबंधांच्या संशयातून खून करून त्याचा मृतदेह धुळे जिल्ह्यात आणून जाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे जळगाव-धुळे सीमेवरील परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

या प्रकरणी जळगाव जिल्ह्यातील पिंपळगाव हरे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी याबाबत माहिती दिली.
संशयातून घडला खून?
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, विजय भिमा राठोड (रा. पिंपळगाव हरे तांडा, जि. जळगाव) यांचा खून झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात संजय परशुराम जाधव (वय ३५, रा. पिंपळगाव हरे तांडा) याच्यासह त्याच्या पत्नीवर संशय व्यक्त करण्यात आला आहे.
संजय जाधव हा बैलांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत असल्याची माहिती आहे. त्याला मृत विजय राठोड आणि त्याच्या पत्नीमध्ये अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. याच संशयातून रागाच्या भरात विजय राठोड यांची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
खून करून मृतदेह धुळ्यात नेल्याचा आरोप
खून केल्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने मृतदेह जळगाव जिल्ह्यातून धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा परिसरात आणल्याचा आरोप आहे.
२१ फेब्रुवारी २०२६ रोजी शिंदखेडा तालुक्यातील अंजनविहिरे गावाजवळील पाटाच्या चारी परिसरात, पुलाजवळ असलेल्या पाइपमध्ये मृतदेह जाळल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.
या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जळालेल्या अवशेषांचा शोध सुरू असून पोलिसांकडून घटनास्थळी तपास सुरू आहे.
पोलिस व फॉरेन्सिक पथक घटनास्थळी
घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव हरे पोलिस ठाण्याचे पथक आणि दोंडाईचा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जळालेल्या मृतदेहाचे अवशेष, हाडे आणि इतर पुरावे शोधण्याचे काम सुरू आहे.
तपासासाठी धुळे पोलिसांकडून फॉरेन्सिक पथकही घटनास्थळी पाठविण्यात आले असून जळालेल्या अवशेषांचे नमुने ताब्यात घेण्यात आले आहेत.
डीएनए तपासणीची शक्यता
मृतदेह पूर्णतः जळाल्यामुळे ओळख पटविणे सुरुवातीला अवघड झाले आहे. त्यामुळे जप्त करण्यात आलेल्या अवशेषांची फॉरेन्सिक तपासणी केली जाणार असून आवश्यक असल्यास डीएनए तपासणीद्वारे मृताची ओळख निश्चित केली जाईल, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
आरोपींचा शोध तीव्र
या खून प्रकरणामुळे जळगाव आणि धुळे जिल्ह्याच्या सीमेवरील भागात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात केली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
घटनेमागील नेमका घटनाक्रम, खून करण्यामागील कारणे आणि त्यानंतर मृतदेह जाळण्यामागील संपूर्ण कट उलगडण्यासाठी पोलिसांकडून तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default