नाशिक शहराला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंध, संशय, वाद आणि सूड यांच्या गुंत्यातून एका 26 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना पेठरोड परिसरात उघडकीस आली असून, पोलिस तपासात हा मृत्यू नसून हत्या असल्याचा संशय अधिक गडद झाला आहे.
पंचवटी पोलिसांनी या प्रकरणात मृत तरुणासोबत राहत असलेल्या 32 वर्षीय विवाहित महिलेस ताब्यात घेतले असून, तिच्या दोन साथीदार महिलांचीही चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमोल पंढरीनाथ दांडगे (वय 26) याचे सोनाली राजेंद्र गायकवाड (वय 32) हिच्यासोबत गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. सोनाली विवाहित असूनही दोघे नवनाथ नगर परिसरातील साळवे चाळ येथे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. या संबंधांना अमोलच्या कुटुंबीयांचा तीव्र विरोध होता. मात्र प्रेमाच्या आहारी गेलेल्या अमोलने स्वतःचे घर सोडून सोनालीसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अमोलचे दुसऱ्या महिलेसोबतही संबंध असल्याची माहिती सोनालीला मिळाली. यावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याचे सांगितले जात आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, याच संशयातून आणि कथित आर्थिक वादातून संतप्त झालेल्या सोनालीने अमोलला कायमचे संपवण्याचा कट रचल्याचा संशय आहे.
अमोल शरीराने मजबूत असल्याने, त्याच्यावर थेट हल्ला करणे कठीण जाईल याची कल्पना असल्याने सोनालीने आपल्या परिचयातील दोन महिलांची मदत घेतल्याचे बोलले जात आहे. त्यानुसार मंदाबाई गायकवाड आणि वैशाली खरात यांना या कटात सहभागी करण्यात आल्याचा तपास यंत्रणांचा प्राथमिक अंदाज आहे.
२५ मेच्या रात्री अमोलचा गळा आवळून खून करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर संपूर्ण प्रकार झाकण्यासाठी “अमोलला अचानक चक्कर येऊन तो पडला” असा बनाव करण्यात आला. शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
सुरुवातीला हा नैसर्गिक मृत्यू असल्याचे भासवण्याचा प्रयत्न झाला. मात्र अमोलच्या गळ्यावर आढळलेल्या संशयास्पद खुणांमुळे डॉक्टरांना संशय आला. शवविच्छेदन अहवालात गळा आवळल्याचे संकेत मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
यानंतर पंचवटी पोलिसांनी सोनाली गायकवाड हिला ताब्यात घेत चौकशी सुरू केली. अमोलच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला असून, या प्रकरणात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
या घटनेमुळे अमोलच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. “जिच्यासाठी त्याने स्वतःचं घर सोडलं, तिनेच त्याचा जीव घेतला,” अशी भावना नातेवाईक व्यक्त करत आहेत.
दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून, आर्थिक व्यवहार, वैयक्तिक वाद आणि प्रेमसंबंध या तिन्ही अंगांनी चौकशी केली जात आहे. शहरात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून, प्रेमसंबंधाच्या वादातून घडलेल्या या संशयित हत्याकांडाने नाशिक हादरले आहे.
