टीसीच्या बदल्यात ‘शरीरसुखा’ची मागणी?अकोल्यातील नामांकित विद्यालय हादरलं; लिपिकावर विनयभंगाचा गुन्हा, शिक्षण व्यवस्थेवर संतापाचा उद्रेक

फुले शाहू आंबेडकर
0

बाळापूर | प्रतिनिधी
अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली असून, मुलीचा शाळा सोडल्याचा दाखला (टीसी) देण्यासाठी एका विद्यालयातील लिपिकाने विद्यार्थिनीच्या आईकडे कथितरित्या अश्लील मागणी केल्याचा गंभीर आरोप झाला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून, पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला आपल्या मुलीच्या निर्गमन दाखल्यासाठी बाळापूर येथील एका नामांकित विद्यालयात गेल्या काही दिवसांपासून वारंवार फेऱ्या मारत होती. दोन ते तीन वेळा लेखी अर्ज करूनही संबंधित लिपिकाकडून मुद्दाम टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप महिलेने केला आहे. प्रशासनाकडून सतत होणाऱ्या दिरंगाईमुळे महिला मानसिक तणावात होती.
दरम्यान, संबंधित लिपिकाने महिलेला “दाखल्याबाबत चर्चा करायची आहे” असे सांगत पारस फाटा परिसरात बोलावल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. महिलेच्या आरोपानुसार, तेथे पोहोचल्यानंतर आरोपीने तिच्याशी अश्लील वर्तन केले, चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला आणि शरीरसुखाची मागणी केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे महिला हादरली आणि तिने तत्काळ तेथून बाहेर पडत थेट बाळापूर पोलिस ठाणे गाठले.
पीडित महिलेने पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल करत आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली. सुरुवातीला आरोपीचे पूर्ण नाव माहिती नसल्याने चुकीचे नाव नमूद झाले होते. मात्र, पुढील चौकशीत संबंधिताचे नाव ‘मनीष शर्मा’ असल्याचे स्पष्ट झाले असून, नाव दुरुस्तीसाठी स्वतंत्र अर्जही पोलिसांकडे सादर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत बाळापूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगासह विविध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू असून, संबंधित शाळा प्रशासनाची भूमिकाही तपासली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन पडघन यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला पतीपासून विभक्त राहत असून मुलीच्या टीसीसाठी विद्यालयात गेली होती. त्यावेळी आरोपीने विविध कारणे देत दाखला देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर बाहेर भेटण्यास बोलावून कथित गैरवर्तन करण्यात आल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. पीडितेच्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेनंतर अकोला जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “शाळा ही विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित जागा असावी, पण जर शैक्षणिक कागदपत्रांसाठी महिलांना अशा अपमानास्पद परिस्थितीला सामोरे जावे लागत असेल, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे,” अशी प्रतिक्रिया संतप्त पालकांकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, सामाजिक संघटना आणि महिला हक्क संघटनांनीही या प्रकरणात आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली असून, शाळा प्रशासनानेही या प्रकरणाबाबत स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी जोर धरत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default