जळगाव | प्रतिनिधी
जळगाव शहरात भ्रष्टाचाराचा एक धक्कादायक चेहरा समोर आला असून, अवैध सावकारी प्रकरणात अनुकूल अहवाल पाठवण्यासाठी लाखोंची लाच मागणाऱ्या सहकारी संस्थांच्या उपनिबंधकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडल्याने प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, या कारवाईनंतर उघड झालेला संपत्तीचा स्फोट अधिकच धक्कादायक ठरला.
उपनिबंधकाच्या बँक लॉकरमध्ये तब्बल कोटींचे सोन्याचे दागिने, सोन्याची बिस्किटे, रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू आढळून आल्याने एसीबी अधिकाऱ्यांनाही अक्षरशः धक्का बसल्याची चर्चा आहे.
या प्रकरणात सहकारी संस्थांचे उपनिबंधक जगदीश बाबुराव बारी (वय ५६) आणि खासगी इसम देविदास धनसिंग पाटील (वय ४४) यांना अटक करण्यात आली असून, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
“गुन्हा टाळायचा असेल तर पैसे द्या!” — तक्रारदाराचा गंभीर आरोप
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराविरुद्ध काही दिवसांपूर्वी अवैध सावकारी संदर्भात कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणाची चौकशी आणि सुनावणी उपनिबंधक कार्यालयात सुरू होती.
तक्रारदार पुढील सुनावणीची तारीख आणि चौकशीसंदर्भात माहिती घेण्यासाठी कार्यालयात गेले असता, उपनिबंधक बारी यांनी कथितपणे धक्कादायक मागणी केली.
तक्रारदार आणि त्यांच्या पत्नीविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल होऊ नये तसेच वरिष्ठांकडे “अनुकूल अहवाल” पाठवण्यासाठी तब्बल पाच लाख रुपयांची लाच मागण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारदाराने १८ मे रोजी एसीबीकडे लेखी तक्रार दिल्यानंतर संपूर्ण प्रकरणाची पडताळणी करण्यात आली. पंचांसमक्ष झालेल्या पडताळणीत लाचेची मागणी स्पष्ट झाल्याचा दावा तपास यंत्रणेने केला आहे.
पाच लाखांवरून तीन लाखांत ‘डील’; पहिला हप्ता घेतानाच सापळा
एसीबीच्या माहितीनुसार, सुरुवातीला पाच लाखांची मागणी करण्यात आली होती. नंतर तडजोडीअंती तीन लाख रुपये स्वीकारण्याचे ठरले.
त्यातील पहिला दीड लाख रुपयांचा हप्ता खासगी इसम देविदास पाटील याच्याकडे देण्याचे सांगण्यात आले होते.
२० मे रोजी एसीबीने सापळा रचला आणि पाटील हा दीड लाखांची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडला गेला. चौकशीत उपनिबंधक बारी यांचा कथित सहभाग समोर आल्यानंतर त्यांनाही ताब्यात घेण्यात आले.
न्यायालयाने दोन्ही संशयितांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
लॉकर उघडला आणि उघड झाले ‘सोन्याचे साम्राज्य’!
सापळा कारवाईनंतर एसीबीने उपनिबंधक बारी यांच्या मालमत्तेची झडती सुरू केली. त्यावेळी भुसावळ येथील कॉसमॉस बँकेत लॉकर असल्याची माहिती मिळाली.
दोन पंचांसमक्ष लॉकर उघडण्यात आला आणि त्यामध्ये आढळलेल्या संपत्तीने तपास पथक थक्क झाले.
जप्त मुद्देमालात समावेश :
६६०.३३० ग्रॅम सोन्याचे दागिने व बिस्किटे
अंदाजे किंमत : ₹९९,०४,९६०
१०.५०० ग्रॅम चांदीचे दागिने
किंमत : ₹२,६२५
रोख रक्कम : ₹८,३६,५००
एकूण जप्त मुद्देमाल : ₹१,०७,४४,०७५
सर्व दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली असून, या संपत्तीचा स्रोत काय, याची आता सखोल चौकशी सुरू झाली आहे.
प्रशासनात खळबळ; आणखी मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता
या कारवाईनंतर सहकार विभागात मोठी खळबळ उडाली असून, अवैध सावकारी प्रकरणांत “अनुकूल अहवाल” देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैशांचा खेळ होत होता का, याबाबत आता चर्चा रंगली आहे.
एसीबीकडून आर्थिक व्यवहार, मालमत्ता, बँक खाते आणि इतर संबंधांची तपासणी सुरू असून, या प्रकरणातून आणखी धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कारवाई करणारे अधिकारी
ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, उपनिरीक्षक सुरेश पाटील तसेच कर्मचारी संगिता पवार, प्रदीप पोळ, मनोज पाटील, अमोल सुर्यवंशी आणि चंद्रशेखर चौधरी यांचा समावेश होता.

