CBIच्या प्राथमिक तपासानुसार, संशयित शुभम मधुकर खैरनार हा वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच करिअर कौन्सलिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संपर्कात होता. त्याने लाखो रुपयांच्या व्यवहारातून प्रश्नपत्रिका मिळवून ती पुढे पाठवल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. या व्यवहारात आणखी काही राज्यांतील व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कुरिअरमार्फत पेपरचा ‘रूट’ देशभर?
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, प्रश्नपत्रिकेचा संच कुरिअरद्वारे पुढे पाठवण्यात आल्याचा संशय आहे. नाशिकहून हरियाणातील गुरुग्रामपर्यंत आणि तेथून राजस्थानपर्यंत प्रश्नपत्रिका पोहोचल्याचा धागा तपासात समोर आल्याची चर्चा आहे. यामुळे पेपरफुटीचे जाळे केवळ एका राज्यापुरते मर्यादित नसून राष्ट्रीय पातळीवर पसरल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
टक्कल करून देवदर्शनाच्या नावाखाली पलायन?
CBIकडून माहिती मिळताच नाशिक पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयिताचा शोध सुरू केला. पोलिस पथक त्याच्या मागावर असताना तो केशकर्तन करून ओळख बदलण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती समोर आली. देवदर्शनाच्या निमित्ताने राज्याबाहेर निघण्याची तयारी सुरू असतानाच पोलिसांनी अवघ्या काही तासांत त्याला ताब्यात घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
पैशांसाठी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ?
तपासातील प्राथमिक माहितीनुसार, प्रश्नपत्रिका सुमारे 10 लाख रुपयांत मिळवून ती 15 लाख रुपयांत पुढे विकल्याचा संशय आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी दिवस-रात्र मेहनत करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी पैशासाठी खेळ करण्यात आल्याचा आरोप आता तीव्र होत आहे.
भावाच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचीही चर्चा
या प्रकरणात संशयिताच्या कुटुंबीयांची पार्श्वभूमीही चर्चेत आली आहे. काही महिन्यांपूर्वी नांदगाव परिसरात अवैध गावठी पिस्तूल प्रकरणात संशयिताच्या लहान भावाचे नाव समोर आले होते. त्या गुन्ह्यात पोलिसांनी कारवाईही केली होती. त्यामुळे तपास यंत्रणा आता या संपूर्ण नेटवर्कचा वेगवेगळ्या गुन्ह्यांशी संबंध आहे का, याचाही शोध घेत असल्याची माहिती समोर येत आहे.
विद्यार्थ्यांवर पुन्हा परीक्षेचं संकट
नाशिक जिल्ह्यात हजारो विद्यार्थ्यांनी NEET परीक्षा दिली होती. मात्र पेपरफुटीच्या आरोपांनंतर परीक्षा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परीक्षा रद्द होण्याची शक्यता आणि पुन्हा परीक्षा द्यावी लागण्याच्या भीतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा मानसिक ताण निर्माण झाला आहे. दोन-दोन वर्षे कठोर मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संताप आणि निराशेचं वातावरण आहे.
CBI चौकशीत आणखी धक्कादायक नावे समोर येणार?
तपास यंत्रणा आता आर्थिक व्यवहार, मोबाईल डेटा, कुरिअर साखळी आणि सोशल मीडिया संपर्कांची बारकाईने छाननी करत आहेत. या प्रकरणात आणखी काही संशयितांची नावे पुढे येण्याची शक्यता असून, देशभरातील मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची चर्चा सुरू आहे.
टीप : या प्रकरणातील सर्व संबंधित व्यक्तींना न्यायालयीन प्रक्रियेनुसार दोष सिद्ध होईपर्यंत आरोपी नव्हे तर संशयित मानले जाते.)श
